|
माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्र्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवूनी सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात
निरध्वनी हे, मूकगान हे, यास म्हणो कोणी
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी
सर्व धर्म हे भेद पंथ ही, सर्व एक झाले
माझे माझे विश्र्व तार ही प्रेमाची बोले
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची उन्नतीची माला
सौभाग्याची तार लागलो मी ही छेडायाला
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली
मंगल मंगल मद्गानाची गती ही शेवटली | |