|
मन वढाळं, वढाळं, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरुन येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्यानं चालल्या, पान्यावरल्या रे लाटा
मन पाखरु पाखरु, याची काय सांगू मात
आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळातं
मन जहरी जहरी, याचं न्यारं रे तंतर
अरे विंचू साप बरा, त्याला उतारे मंतर
मन एवढं एवढं, जसा खसखसचा दाणा
मन केवढं केवढं, त्यात आभाळ माईना
असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं
कुठे जागेपणी तुला, असं सपन पडलं | |